एस. व्ही. जे. सी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा संगीतमय आविष्कार सादर करणाऱ्या ‘शिवभूपाल’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पुणे येथील श्री. होनराज मावळे लिखित व संगीतबद्ध केलेला आणि सृजनसभा, पुणे यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून भारतीय शास्त्रीय संगीत व मूळ बंदिशींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग उलगडण्यात आले.शिवाजी महाराजांचा जन्म, राजमाता जिजाऊंची प्रेरणा, स्वराज्य स्थापनेचा संकल्प, अफझलखानाचा प्रसंग आणि शिवराज्याभिषेक यांसारखे महत्त्वपूर्ण प्रसंग प्रभावी संगीत व सादरीकरणातून विद्यार्थ्यांसमोर जिवंत करण्यात आले. इतिहास, साहित्य आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी परिचय झाला. धैर्य, नेतृत्व, न्याय, देशप्रेम आणि स्वराज्यनिष्ठा या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली. शिवभूपाल’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक व शैक्षणिक अनुभव ठरला. संगीताच्या माध्यमातून इतिहास जिवंत करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.